नाऱ्या म्हणजे नारायणचं (संकर्षण कऱ्हाडे) तसं बरं चाललेलं असतं. जीवापाड प्रेम करणारे आई-बाबा(रूपलक्ष्मी चौगुले, यतीन कार्येकर) आणि मायेने जोजवणारे आजोबा-आत्या (विक्रम गोखले, आशा तारे), यांच्या छत्रछायेखाली तो आयुष्य छान जगत असतो. इंजिनीअरिंगऐवजी त्याचं लक्ष वेगवेगळे उद्योगधंदे करण्याकडे लागलेलं असतं. यश कशातच येत नसतं, परंतु त्याला कुणी काही बोलतही नाही. कारण तो सगळ्यांचा लाडका असतो. सगळेजण त्याला आणि त्याच्या मनाला फुलासारखे जपत असतात. नात्यांची एक सुरेख विण या कुटुंबात बघायला मिळत असते. घर असावं तर असं आणि घरातली माणसं असावीत तर अशीच, असंच कुणालाही नाऱ्याचं कुटुंब पाहून वाटावं...
... पण एक दिवस कुणाची तरी कळ काढलेला नाऱ्या चुकून अडगळीच्या खोलीत जाऊन लपतो. नि तिथे त्याच्यासमोर भूतकाळ उभा राहतो, गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांची मालिका घेऊन. काय खरं मानावं आणि काय खोटं, हेच त्याला कळत नाही. आजवर सुरेख नात्यांनी बांधलेला आणि मायेच्या भावनेने विणलेला त्याचा खोपा उद्ध्वस्त होतो.
हा खोपा पुन्हा सांधला जातो का, त्यातली माणसं पुन्हा एकत्र येतात का आणि पुन्हा मायेचा ओलावा निर्माण होतो का, ते पाहण्या-अनुभवण्यासाठी 'खोपा' सिनेमा प्रत्यक्षच पाहावा लागेल. मात्र एक नक्की की हा सिनेमा तुम्हाला आपल्या नात्यांचा पुनर्विचार करायला नक्की भाग पाडेल. या सिनेमाचं वेगळेपण म्हणजे ३० सप्टेंबर १९९३ला लातूर जिल्ह्यातील किल्लारीला झालेल्या भूकंपाचा अतिशय सकारात्मक वापर 'खोपा' मध्ये करण्यात आला आहे. किल्लारीतील भूकंपाने होत्याचं नव्हतं केलं, जिवंत माणसांना आयुष्यभराचं दुःख दिलं. नात्यांची पार मोडतोड केली. परंतु हीच मोडतोड जोडण्याचा कलात्मक प्रयत्न 'खोपा'मध्ये करण्यात आला आहे.
'खोपा'चा बाकी आशय आणि एकूण निर्मिती यथातथा आहे. परंतु कथेच्या पातळीवर खोपा नक्कीच चांगला आहे. संकर्षण, विक्रम गोखले, यतीन कार्येकर सगळ्या महत्त्वाच्या कलाकारांची कामं चांगली झाली आहेत. भारत गणेशपुरे यांनी खलनायकाची भूमिकाही चांगली वठलीय. गीत-संगीतही ठाकठीक. मात्र लोकगा‌यिका गोदावरी मुंडे यांनी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर गायलेलं गाणं, जुनी वेदना मुखर करणारं आहे.
0 comments: